
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागांत पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात तर विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी हा कमी दाबाचा पट्टा काहीसा कमकुवत झाला असला तरी, वातावरणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम असल्याने पावसाचा जोर टिकून आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात उत्तर कोकण आणि मुंबईत अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवली होती, ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक मोठी विश्रांती घेतली. यामुळे उकाडा वाढला आणि पावसाअभावी शेतीची कामेही रखडली होती. आता पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून, खोळंबलेल्या शेतीकामांना वेग आला आहे. मुंबईत पावसाची हजेरी; बुधवारपासून जोर वाढणार! शनिवारी रात्रीपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दादर, वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले आणि मध्य उपनगरांमध्ये शनिवारी रात्री चांगला पाऊस झाला. रविवारी सकाळपासूनच शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते, मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांत रविवारी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. किनारपट्टीवर उच्च भरतीचा इशारा दरम्यान, अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा २४ तासांचा ऑरेंजअलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंपामुळे कोणताही समुद्री धोका निर्माण झालेला नसला, तरी उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका, ट्रॉलर आणि मासेमारी साहित्य सुरक्षितपणे बांधून ठेवावे, तसेच किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटक आणि लहान मुलांनी समुद्रकिनाऱ्यावर किंवा खडकाळ भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. समुद्रात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भारतीय तटरक्षक दलाच्या १५५४, किनारी सुरक्षा हेल्पलाईन १०९३ तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.